जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
शहरात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने धडक कारवाई केली. सोमवारी दिवसभर राबविलेल्या या विशेष मोहिमेत एकूण २२ रिक्षांवर कारवाई करून त्या शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या. संबंधित चालकांविरुद्ध दंडात्मक प्रक्रिया सुरू असून त्यांना न्यायालयातून दंड ठोठावला जाणार आहे.
शहरातील अनेक भागांत बेशिस्त रिक्षा वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी वाहतूक शाखेने सकाळपासून मोहीम हाती घेतली. शिवाजीनगर, टॉवर चौक, सुभाष चौक, दाणाबाजार आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
रिक्षाचालकांकडून चालकाच्या बाजूस अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक केल्याचे प्रकारही आढळून आले. अशा सर्व रिक्षांवर नियमांनुसार कारवाई करीत वाहतूक शाखेत आणण्यात आले. पुढील तपासणीसाठी न्यायालयीन दंडाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.





















