
जळगाव मिरर । संदीप महाले
जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. पक्षांकडून अधिकृत घोषणा बाकी असतानाच इच्छुक उमेदवारांनी मैदानात उतरत उमेदवारीसाठी गुढघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र सध्या शहरभर दिसून येत आहे. “आता नाही तर कधीच नाही” या मानसिकतेतून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
प्रत्येक प्रभागात इच्छुकांची रांग लागली असून, एका जागेसाठी अनेक दावेदार पुढे आल्याने पक्षांतर्गत ताणतणाव वाढू लागला आहे. पक्ष कार्यालये असोत वा नेत्यांची दारे, सर्वत्र शिफारशी, भेटीगाठी आणि राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू आहे. काही ठिकाणी तर निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचाराचे फलक, समाजोपयोगी कार्यक्रम आणि जनसंपर्क मोहीमसह भंडारे देखील सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एका प्रभागात अनेक बाशिंगधारी!
जळगाव मनपातील सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी प्रभागनिहाय समीकरणे तपासली जात असून, एकाच प्रभागात अनेक इच्छुकांमुळे अंतर्गत गटबाजी उफाळून येत आहे. काही ठिकाणी नाराजीचे सूर, तर काही ठिकाणी ‘बंडखोरी’ची कुजबुज ऐकू येत आहे. त्यामुळे निष्ठावंताना उमेदवारी मिळते कि पक्षात नव्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
विकासावरून राजकीय हल्लाबोल
शहरात रस्त्यांची अवस्था, पाणीटंचाई, ड्रेनेज, स्वच्छतेचा बोजवारा, स्मार्ट सिटीची रखडलेली कामे हे मुद्दे आता राजकीय अस्त्र बनू लागले आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागातील विकासाचा हिशेब मांडत, प्रतिस्पर्ध्यांवर थेट हल्लाबोल करताना दिसत आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये जोश तर नेत्यांची धावपळ
प्रत्येक परिसरात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, “यावेळी प्रभाग खेचून आणायचाच” असा निर्धार व्यक्त केला जात आहे. यामुळे वरिष्ठ नेत्यांचीही धावपळ वाढली असून, योग्य उमेदवार शोधताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. एकूणच, मनपा निवडणूक जाहीर होण्याआधीच जळगावात राजकीय रणशिंग फुंकले गेले असून, बाशिंग बांधलेल्या इच्छुकांमुळे येत्या काळात शहराचे राजकारण अधिकच तापणार, हे निश्चित आहे.




















