
जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील प्रमुख चौक असलेल्या अजिंठा चौफुली परिसरातील वाहतूक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या अयोध्या नगरवासीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. अयोध्या नगर हा सुमारे ३० ते ४० हजार लोकवस्तीचा मोठा परिसर असून, येथील नागरिकांना अजिंठा चौफुलीवरून गावात ये-जा करताना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
अजिंठा चौफुलीवरून अयोध्या नगरकडे जाण्यासाठी नागरिकांना रॉंग साईडने सिग्नल ओलांडावा लागत असल्याने रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जातात, तसेच वयोवृद्ध नागरिक आणि महिला वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने नमूद केले. समोरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहनचालकांचे प्राण धोक्यात येत असून, परिसरात कायमस्वरूपी भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.
अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीकडे जाण्यासाठी सर्विस रोड उपलब्ध असूनही काही धनदांडग्या व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे तो रस्ता प्रलंबित ठेवण्यात आला आहे, असा गंभीर आरोपही करण्यात आला. सध्या तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अपुरा ठरत असून, त्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी आणि वादाचे प्रसंग नित्याचे झाले आहेत.
या चौफुलीवर एसटी लक्झरी बस थांबत असल्यामुळे छोट्या वाहनांना अयोध्या नगरकडे वळण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी, वाहतूक कोंडी, वादविवाद आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. आरोग्याच्या कारणासाठी शहरात जाणे असो वा अंत्यविधीसाठी वाहने जाणे असो, प्रत्येक वेळी अयोध्या नगरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप करत मनसेने प्रशासन आणि महापालिकेला धारेवर धरले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एमआयडीसीशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला.
या सर्व समस्यांवर १० दिवसांत तोडगा काढावा, अन्यथा अयोध्या नगरवासीयांना सोबत घेऊन अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा मनसे जळगाव महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.




















