जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
येथे 9 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेत ग्रामीण धुळे जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडू नयन सोनवणे यांनी वरिष्ठ गटात रौप्य पदक पटकावून धुळे जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व सुरू केले, तर रोहित सोनवणे यांनी कांस्य पदक मिळवून जिल्ह्याच्या यशात मोलाची भर घातली.
या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील ओम राजपूत यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यांच्या खेळातील तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वास क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
विशेष म्हणजे, हे सर्व खेळाडू किसान विद्या प्रसारक संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या केव्हीपीएस बॉक्सिंग क्लब, शिरपूर प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून यापूर्वीही खेलो इंडिया, राष्ट्रीय शालेय, राज्यस्तरीय तसेच विविध मानांकित स्पर्धांमधून अनेक पदक विजेते खेळाडू घडले आहेत. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि दीर्घकालीन नियोजनाच्या जोरावर या प्रशिक्षण केंद्राचा पुढील काळात ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू घडवण्याचा ठाम मानस व ध्येय आहे.
या यशामागे खेळाडूंची कठोर मेहनत जितकी महत्त्वाची आहे, तितकेच केव्हीपीएस बॉक्सिंग क्लबचे अनुभवी प्रशिक्षक विजेंद्र जाधव आणि प्रा. भरत कोळी यांचे शिस्तबद्ध मार्गदर्शन व तांत्रिक प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरले आहे.
ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा असूनही खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चिकाटी व शिस्त ही संपूर्ण ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळत आहे.
“ग्रामीण भागातील खेळाडू नयन सोनवणे यांनी वरिष्ठ गटात रोप्य पदक मिळवणे हे धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या यशामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल.”
— डॉ. तुषार रंधे
(उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना तथा अध्यक्ष, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना)
या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासो निशांतजी रंधे, खजिनदार सौ. आशाताई रंधे, विश्वस्त रोहित बाबा रंधे, क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे, क्रीडा शिक्षक नूर तेली, बॉक्सिंग प्रशिक्षक सागर कोळी, धीरज पाटील, पूनम उठवाल, राज्य पंच ऋषिकेश अहिरे, भूषण पवार सर्व शिक्षकवृंद, सहकारी व क्रीडा प्रेमींनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना उपाध्यक्ष तथा अध्यक्ष,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जैन, खजिनदार राजेंद्र बोरसे, क्रीडा संचालक डॉ.लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील, धुळे जिल्हा व नाशिक विभागीय सचिव मयूर बोरसे यांनी अभिनंदन केले.
ग्रामीण धुळे जिल्ह्यातून घडलेले हे यश केवळ पदकापुरते मर्यादित नसून, संपूर्ण ग्रामीण युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत असून जिल्ह्यातील बॉक्सिंग चळवळीला नवी दिशा देणारे आहे.





















