जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, दोघांच्याही विचारांची दिशा एकच असून महाराष्ट्राचे राजकारण हे आज शिशारी आणणारे बनले आहे.
“महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरलेला आहे. माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्याला काहीही किंमत उरलेली नाही. सर्व काही भ्रष्ट पैशांच्या जोरावर तोडले जात आहे,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासारखे मांडलिक राजे उभे केले जात असून ते स्वतःला या राज्याचे राजा समजत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “या गुलामीच्या बाजारात बोली लावली जात आहे. या गुलामांच्या राज्याचे दोन बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत. मात्र त्यांची गुलामी आम्ही किंवा महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही,” असे ठाम मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांमधील जवळीक आणि युतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, दोन्ही गट जवळजवळ एकत्र आल्यासारखेच दिसत आहेत. “ते एकाच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे हा प्रश्न आता विचारण्याला काही अर्थ उरत नाही,” असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. सोलापूरमध्ये दोन शिवसेना एकत्र लढणार असल्याच्या चर्चांबाबत राऊत म्हणाले की, असा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती त्यांच्याकडे नाही. “शिंदे गटाबाबत आमच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याशिवाय या विषयावर काहीही बोलणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले.
“शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील असा विचार का केला जातो? उलट अजित पवार शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का केला जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार सध्या महायुतीत असले तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावलेला आहे, असा दावा करत राऊत म्हणाले, “दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. काहीतरी एक सोडावंच लागतं. त्यामुळे अजित पवारांना अखेरीस महायुतीतून बाहेर पडावं लागेल.” संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.





















