जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. “अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. राज्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्राच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. अशा प्रकारचे नेतृत्व घडायला अनेक वर्षे लागतात,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, अजित पवार हे अतिशय संघर्षातून तयार झालेले नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे, जनसामान्यांमध्ये ज्यांच्याविषयी प्रचंड आस्था होती असे ते व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. अशा काळात त्यांचे जाणे अविश्वसनीय असून मनाला चटका लावणारे आहे. “वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी एक दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला आहे,” असेही फडणवीस म्हणाले.
या दुर्घटनेचा आघात अजित पवार यांच्या कुटुंबावरही मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण लवकरच बारामतीकडे रवाना होत आहोत. सकाळपासूनच सर्वांशी संपर्कात असून माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना घडलेल्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. बारामती शहरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पवार कुटुंबीयांशी चर्चा करून पुढील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशा लोकनेत्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी भरून काढणे कठीण आहे. या घटनेवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.




















