जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका व्यावसायिकाची तब्बल ९ लाख ५६ हजार ९०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऑनलाईन ठगांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर हेमंत व्यास (वय २६, रा. सिद्धीविनायक पार्क, जळगाव) हे शहरात एसी सर्व्हिस सेंटरचा व्यवसाय करतात. १४ जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर टेलिग्राम चॅनल ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी संदेश आला. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा आर्थिक नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
प्रारंभी व्यास यांना २० हजार रुपये गुंतवून एक टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यांनी ती रक्कम ऑनलाईन पाठविल्यानंतर आणखी एका टास्कसाठी ५९ हजार ८०० रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतरही टास्क पूर्ण झालेला नसल्याचे कारण देत आणखी १८ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
याच पद्धतीने वेळोवेळी मोठ्या परताव्याचे आणि अधिक नफ्याचे आमिष दाखवत ठगांनी त्यांच्याकडून विविध व्यवहारांद्वारे एकूण ९ लाख ५६ हजार ९०० रुपये उकळले. पैसे गुंतवल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही. उलट आणखी रक्कम भरण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यास यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ऑनलाईन ठगांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्यवहारांची माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.




















