जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून, कुटुंबीय, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारांना संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामतीत दाखल होणार आहेत.
बारामती येथे बुधवारी सकाळी ८.४६ वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६ वर्षे ६ महिने ६ दिवस) यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघातात वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव यांचाही मृत्यू झाला असून एकही जण वाचू शकला नाही.
ही धक्कादायक घटना घडली तेव्हा अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पार्थ पवार दिल्ली येथे होते. ते दुपारी विमानाने पुण्यात दाखल होऊन त्यानंतर रस्तेमार्गे बारामतीत पोहोचले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईहून थेट विमानाने बारामतीत आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल देवव्रत तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बारामतीत दाखल झाले.
दरम्यान, बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात सकाळी ९ वाजेपासूनच जनसागर उसळला होता. सकाळी ९.४५ वाजता अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा अमर रहे’, ‘अजित पवार परत या’, ‘एकच वादा, अजितदादा’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. उत्तर तपासणीसाठी पार्थिव स्ट्रेचरवर आणले असता उपस्थित नागरिक अक्षरशः हुंदके देत रडत होते. श्रीनिवास पवार यांनी उपस्थितांचे सांत्वन केले. दुपारी २ ते २.१५ च्या सुमारास सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार रुग्णालयात दाखल होताच संपूर्ण वातावरण अधिकच भावनिक झाले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, राज्याने एक कर्तृत्ववान आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.




















