जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२६
वेगवेगळ्या कंपनीचे टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवित मिलिंद विलास मंडाडुळे (वय ४६, रा. रामेश्वर कॉलनी) यांची १८ लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना दि. १५ जानेवारी २०२५ ते दि. २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात प्रवीण भास्कर भामरे (वय ६०, रा. नशिराबाद, ह.मु. धुळे) व आशितोष प्रवीण भामरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील मिलिंद मंडाडुळे यांचे वाहने मालवाहतुकीसाठी नशिराबाद येथील सिमेंट कंपनीत लावलेली आहे. त्याठिकाणी त्यांची प्रवीण भामरे व आशितोष भामरे या दोघांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी मंडाडुळे यांना विविध साखर, कांदा कारखाने येथे परिचय असून कंपन्यांचे टेंडर घेत असल्याचे सांगितले. तुम्हालाही टेंडर मिळवून देतो, असे अमिष दाखविले. त्यासाठी दोघांनी त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन एकूण १८ लाख रुपये घेतले होते. मात्र टेंडर मिळाले नाही व पैसे परत देण्याची वेळ आली त्या वेळी दोघे जण नशिराबाद येथून पसार झाले.
पैसे परत मिळत नसल्याने मंडाडुळे यांनी सिमेंट कंपनीत जाऊन चौकशी केली. मात्र भामरे यांचे कंपनीमध्ये कोणतेही टेंडर नसल्याचे समोर आले. या प्रकरणी मिलिंद मंडाडुळे यांनी दि. २४ ऑगस्ट रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रवीण भामरे, आशितोष भामरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करत आहेत.




















