जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासाशी संबंधित घटनेबाबत संशय व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आहे. या प्रकरणात विविध तर्कवितर्क मांडले जात असून, त्यावर स्पष्टता यावी यासाठी अजित पवार घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सोनवणे म्हणाले की, संबंधित घटनेविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यामुळे केवळ चर्चांऐवजी सखोल व पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे. विमानातील प्रवासी संख्या, पायलटची माहिती, तसेच घटनेच्या दिवशीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
सोनवणे यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, घटनेच्या स्वरूपाबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. या सर्व बाबींची अधिकृत चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अफवांना पूर्णविराम मिळेल.
याचवेळी बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या राजकीय संबंधांबाबतही भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझ्या राजकीय जडणघडणीत अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. ते माझ्यासाठी राजकीय मार्गदर्शक होते. आज संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे अस्वस्थ आहे.”
बीड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात बोलताना सोनवणे म्हणाले की, अजित पवार यांचे नेतृत्व बीडसाठी महत्त्वाचे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली विकासकामे पुढे कशी जातील, याबाबत सध्या अनिश्चितता आहे. मात्र सध्या राजकारणावर बोलण्याची वेळ नसून, सत्य बाहेर यावे यासाठी निष्पक्ष तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




















