जळगाव मिरर | २१ फेब्रुवारी २०२६
चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर बापजी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाद हा प्लॉट व्यवहाराशी निगडित असून सुमारे ३ लाख रुपयांची टोकन रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर पुढील खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत न्यायालय परिसरातच पोहोचला. दुपारच्या सुमारास न्यायालय परिसरात उपस्थित असताना ५ ते ६ जणांनी अॅड. समीर शेख यांना घेरून धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी तत्काळ धाव घेऊन जखमी अवस्थेतील शेख यांना उपचारासाठी बापजी हॉस्पिटल येथे दाखल केले.
घटनेनंतर वकिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालय परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणीच सुरक्षिततेचा अभाव असल्यास सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही वकिलांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





















