
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका महिलेचा संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून लोहमार्ग पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी व सध्या वसई (पूर्व) येथे वास्तव्यास असलेले अजय कुमार (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह २१ फेब्रुवारी रोजी सकाळी कुर्ला टर्मिनस येथून गोरखपूरकडे काशी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. संबंधित गाडी दुपारी सुमारे १२.४४ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबली होती. गाडी पुढे सुटल्यानंतर काही वेळात अजय कुमार यांच्या पत्नी किरण रावत (वय ३८) या डब्यात दिसून आल्या नाहीत. चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान संपूर्ण गाडीत शोध घेतला असता त्या आढळून न आल्याने त्या चाळीसगाव स्थानक परिसरातून हरवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हरवलेल्या महिलेचे वर्णन असे : रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट, बांधा सडपातळ, केस सोनेरी रंगाचे. अंगात नेव्ही ब्ल्यू रंगाचा पंजाबी ड्रेस होता. डाव्या हाताच्या मनगटावर ‘एके’ असे गोंदलेले आहे. संबंधित महिलेला हिंदी भाषा येते. या प्रकरणी चाळीसगाव येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, महिलेबाबत कोणतीही माहिती असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.




















