
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम व दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर येथील रहिवासी सुरेश तुकाराम पाटील हे कामानिमित्त अमळनेर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून त्यातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला.
दरम्यान, सुरेश पाटील हे बुधवारी सकाळी घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाट उघडे असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यांनी तत्काळ पाळधी पोलीस चौकीत धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
दरम्यान, याच रात्री भजी गल्ली परिसरातील रहिवासी भूषण प्रभाकर पाटील यांच्या घरातही घरफोडी झाली. ते घराला खाली कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांनीही पाळधी पोलिसांना माहिती दिली. या दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळत आहे. मात्र सायंकाळपर्यंत नेमका किती ऐवज चोरीस गेला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, घटनेनंतर पाळधी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



















