
जळगाव मिरर | १३ मार्च २०२६
चाळीसगाव शहरातील देशमुख, राजपूत स्मशान भूमीसमोरील किराणा मालाच्या एजन्सीच्या दुकानाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४७ हजारांचे किराणा साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील टिळक चौकातील जितेश सतीष गुप्ता व्यांचे प्रदीपदादा नगर, देशमुख-राजपूत स्मशानभूमीसमोर गुप्ता एजन्सी नावाचे किराणा दुकान आहे. दरम्यान, पत्न च्या वैद्यकीय उपचारासाठी गुप्ता हे बाहेरगावी गेले होते. दरम्यान, त्यांनी दुकानातील कामगाराला दुकानावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. तर, ११ मार्चला दुकानातील साहित्याची तपासणी केली असता काही किराणा साहित्य कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यामध्ये संतूर साबणाचे बॉक्स, सरगम साबण, वाघ बकरी चहा, ऑल आऊट, जिरे, बेसन पीठ तसेच भांडी धुण्याचा साबण असा ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समोर आले. चोरट्यांनी दुकानाच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून किराणा माल लंपास केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दुकानमालक जितेश गुप्ता यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार योगेश मांडोळे करत आहेत.





















