
जळगाव मिरर | १४ मार्च २०२६
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावाजवळ शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० ईएल ८४६७क्रमांकाची आयशर गाडी सकाळी सुमारे ११:१५ वाजता जामनेर रोडवरील हॉटेल राजगड समोर उभी असताना वाहनातील मालाला अचानक आग लागली. सुरुवातीला धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. वाहनातून उठणाऱ्या धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच भुसावळ अग्निशमन दल आणि जामनेर अग्निशमन दल यांना कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्न ांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, वाहन चालक उमेश रमेश जाधव (रा. हातनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी धाडसाने आणि प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेत वाहनातील मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आयशर वाहनात इंडस्ट्रियल मटेरियल, सिलेंडर तसेच विविध उद्योगसामग्री असल्याची माहिती संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर अरविंद उत्तम खंडारे यांनी दिली. आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप लागलेला नाही.
घटनेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली. आगीची भीषणता पाहता काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे येथील आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.




















