
जळगाव मिरर | १५ मार्च २०२६
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाणे हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक सत्य समोर आले आहे. प्रेमसंबंधातून या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथील विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरातून कुणालाही काही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कोठेच मिळून न आल्याने त्याचा भाऊ संजय भिमा राठोड (वय ३३) यांनी २६ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद (क्रमांक १५/२०२६) केली होती.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संजय परशुराम जाधव याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक कबुली दिली आणि या प्रकरणामागील खुनाचे गूढ उलगडले.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव हिचे मयत विजय राठोड याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनालीचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केले होते. त्यावरून तो तिला वारंवार धमकावत होता. ही बाब समजल्यानंतर संजय जाधव याने पत्नी सोनालीच्या मदतीने विजय राठोड याची हत्या केल्याचे चौकशीत कबूल केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचीही माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संजय जाधव व सोनाली जाधव या पती-पत्नीला अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे व सागर पाटील यांनी सहभाग घेतला.




















