
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक तरुणीचे नाव वैष्णवी लाटे असून, तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पती आणि सासरकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण छळाचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ऐन उमेदीच्या काळात एका तरुणीने स्वतःचे प्राण संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले असले तरी नंतर पती यशवंत लाटे व सासरच्या इतर सदस्यांनी पैशांच्या मागणीसाठी सतत छळ सुरू केला. पतीकडून होणारी शिवीगाळ, शारीरिक मारहाण आणि माहेरून पैसे आणण्याचा दबाव यामुळे वैष्णवी गंभीर मानसिक तणावाखाली होती.
तक्रारीत म्हटले आहे की, वैष्णवीचे सासू, सासरा व दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला, तसेच मारहाण देखील केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर १४ मार्च रोजी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध छळाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या काही काळात सासरच्या जाचेमुळे एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण समाजात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संतप्त नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत: “सासरच्या जाचाला कंटाळून अजून किती ‘वैष्णवी’ अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणार?”





















