
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
चोपडा तालुक्यातील नारोद येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेत मोठ्या भावानेच लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारोद येथील रहिवासी रोहन पानाचंद पाटील (वय २३) हा २१ तारखेला दुपारी सुमारास गावाजवळील गूळ नदी पात्रात संशयास्पद अवस्थेत मृत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पायांवर गंभीर जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. गावकऱ्यांनी ही माहिती पोलीस पाटील विजय पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तसेच चोपडा विभागाचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप आणि स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान रोहन हा दारूच्या नशेच्या आहारी गेला होता आणि तो आई-वडील व भावाला वारंवार शिवीगाळ करून त्रास देत असल्याची माहिती समोर आली. दररोजच्या वादाला कंटाळून मोठा भाऊ किरण याने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले.
घटनेच्या दिवशी रात्री किरणने रोहनला ५ हजार रुपये दिले होते. त्या पैशातून रोहनने दारू प्राशन केले. त्यानंतर संधी साधून किरणने त्याला गूळ नदीवरील केटीवेअरवरून खाली ढकलले. यात रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर किरणने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांनी संशयाच्या आधारे किरणला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील जखमा आणि विसंगत उत्तरे पाहून पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच किरणने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















