
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेले गुमास्ता नितीन केशव पाटील (वय ५०, रा. ढेकू अंबासन) यांचा कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे बाजार समिती परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पाटील हे नेहमीप्रमाणे बाजार समितीतील लिलाव शेडवर आपले कामकाज पाहत होते. लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ जवळील व्यापाऱ्यांना याची माहिती दिली.
व्यापाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळील खासगी दवाखान्यात, डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
नितीन पाटील हे मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सहकारी, व्यापारी व शेतकरी वर्गात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच १४ मार्च रोजी त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले होते. त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.




















