
जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६
राज्यातील चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, दोन उच्चपदस्थ महिला पोलिस अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याची बाब उघडकीस आली आहे. या दोन्ही अधिकारी डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या असून, पसंतीच्या पोस्टिंगसाठी त्यांनी खरातशी संपर्क साधल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 13 गुन्हे दाखल झाले असून, त्यात 8 लैंगिक शोषणाचे, 4 आर्थिक फसवणुकीचे आणि एक मनी लाँड्रिंगचा गुन्हा समाविष्ट आहे. त्याच्या कथित काळ्या कारनाम्यांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक महिलांचे शोषण केल्याचे आरोप त्याच्यावर असून, या प्रकरणात राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने या प्रकरणाने देशभरातही लक्ष वेधले आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्यांनी खरातला नियमबाह्य मदत केल्याचा संशय आहे. प्रशासकीय कामकाजात सवलती देणे, प्रभाव वापरणे आणि त्याबदल्यात पोस्टिंगसाठी मदत मिळवणे, अशा प्रकारचे व्यवहार झाल्याची शक्यता तपासली जात आहे. याशिवाय, या अधिकाऱ्यांमध्ये आणि खरात यांच्यात आर्थिक देवाणघेवाणही झाल्याचे धागेदोरे तपास यंत्रणांना मिळाले आहेत.
या प्रकरणात केवळ बदलीपुरते व्यवहार मर्यादित नसून, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय अधिक बळावत आहे. त्यामुळे खरातच्या कथित बेकायदेशीर कारवायांना या अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळाले होते का, या दिशेने SIT कसून तपास करत आहे.
तांत्रिक पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील समोर येत असल्याने संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. या प्रकरणात लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, काही बड्या व्यक्तींवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.






















