
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पुनर्वसन प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मतदारसंघातील विविध गावांमधील पुनर्वसन कामे आणि नागरी सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत मुक्ताईनगर शहरातील ४१३ घरांसह तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे, नरवेल, पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक आणि आंदलवाडी या गावांतील रखडलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांनाही या निधीतून चालना दिली जाणार आहे.
या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह नंदकुमार महाजन, विनोद तराड आणि संबंधित गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. या निर्णयामुळे मुक्ताईनगर परिसरातील पुनर्वसन आणि विकासाच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















