
जळगाव मिरर | १० एप्रिल २०२६
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात एका १० वर्षीय मुलाच्या अचानक बेपत्ता झाल्याने काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे अवघ्या दोन तासांत मुलाचा शोध लागल्याने कुटुंबीयांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ईकबाल शहा हसन शहा (वय ३०) यांचा मुलगा दुपारी १२ ते १.३० वाजेच्या दरम्यान घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. बराच वेळ उलटूनही मुलगा परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली.
रात्री सुमारे ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत विशेष पथकाची नियुक्ती केली. भुसावळ परिसरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करत शोधकार्य अधिक तीव्र करण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुलाचा ठाव भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात लागला. पोलिस पथकाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेत मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, गुन्हा नोंद झाल्यानंतर अवघ्या १ ते २ तासांच्या आतच मुलाचा शोध लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सुकराम सावकारे, फिरोज पठाण, सुनील जाधव आणि प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मुलगा सुरक्षित परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, अपहरणाच्या भीतीतून ते पूर्णपणे सावरले आहेत. नागरिकांनीही वरणगाव पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक केले आहे.





















