
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
जळगाव ते संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित ‘खान्देश एक्सप्रेस’ महामार्गाला माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्याची मागणी विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकृत पत्र पाठवून शासनाचे लक्ष वेधले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव आणि संभाजीनगर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा सहा पदरी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यात तो समृद्धी महामार्गालाही जोडला जाणार आहे. सुमारे 105 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, प्रतिभाताई पाटील यांनी राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांनी राज्यपाल, केंद्रीय मंत्री तसेच देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून गौरवशाली कामगिरी केली आहे. खान्देशच्या मातीतून घडलेल्या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून या महामार्गाला त्यांचे नाव देणे योग्य ठरेल. तसेच राज्यातील इतर महामार्गांना जसे बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकभावना आणि प्रतिभाताई पाटील यांच्या कार्याचा आदर ठेवून शासनाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा आणि संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंतीही खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.





















