
जळगाव मिरर | संदीप महाले
राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून जळगाव जिल्ह्यातही इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर घराणेशाहीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून घटक पक्षांतील अनेक नेत्यांनी जळगाव जिल्ह्यातील जागेवर दावा सांगितला आहे. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी देताना नेत्यांच्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. त्यामुळे “कार्यकर्ते केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महायुतीतील अनेक पक्षांनी यापूर्वी घराणेशाहीवर टीका केली होती. मात्र आता त्याच पक्षांतील नेते आपल्या कुटुंबीयांना संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने विरोधकांकडून टीकेची धार अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय पक्षांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, आंदोलने करणारे आणि प्रसंगी गुन्हे दाखल होण्याची पर्वा न करणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र दुय्यम ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक कार्यकर्त्यांना बाजूला सारून नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिली जाते, अशी खंतही बोलून दाखवली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागेसाठी अखेर कोणाला उमेदवारी मिळते, नेत्यांच्या कुटुंबीयांना की निष्ठावंत कार्यकर्त्यांना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावरून आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.





















