
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२६
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखून तातडीने गतिरोधक बसविण्याची आणि अवजड वाहनांना शहराबाहेरील पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव येथील प्रकल्प संचालकांना लेखी निवेदन दिले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहरातून पाळधी ते तरसोद फाटा या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग जातो. शहरातील विविध कॉलनी व रस्ते या महामार्गाशी जोडलेले असल्याने नागरिकांना रोज या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वारंवार अपघात घडत आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) ओळखून तेथे तातडीने गतिरोधक बसविणे गरजेचे असल्याचे सांगत, हे गतिरोधक वाहनचालकांना स्पष्ट दिसतील अशा प्रकारे रंगविण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः पुढील ठिकाणांवर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे
पोद्दार स्कूल, आहुजा नगर स्टॉप, मानराज स्टॉप, साई पॅलेस हॉटेल स्टॉप, द्वारका नगर स्टॉप याशिवाय, जळगाव औद्योगिक वसाहतीकडे आणि संभाजीनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी शहरातील मुख्य महामार्गाऐवजी बायपास मार्गाचा वापर करावा, यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कमी होऊन अपघातांची संख्या घटेल व नागरिकांचे प्राण वाचतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बांभोरी परिसरातील गिरणा नदीवरील पुलाजवळील खड्डे बुजवून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.





















