
जळगाव मिरर | ३ मे २०२६
वरणगाव (ता. भुसावळ) येथील काळबांडे वाडा परिसरात एका कुटुंबावर दुर्दैवी घटना ओढवली असून लग्नाच्या दिवशीच काकांच्या निधनामुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. येथील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या मुलीचे लग्न दि. १ मे रोजी निश्चित झाले होते. या लग्नासाठी गव्हाणकर परिवारात अनेक दिवसांपासून उत्साहाचे वातावरण होते. घरात पाहुण्यांची ये-जा, तयारीची लगबग आणि आनंदाचे क्षण सुरू होते.
लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुतणीच्या लग्नासाठी विशेष उत्साही असलेले तिचे काका सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (वय ५२) यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री लवकर झोपायला गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना उठविण्यास गेले असता ते प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. तातडीने पाहणी केली असता झोपेतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे लग्नाच्या घरातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले आणि सर्वत्र शोककळा पसरली. लग्नाचा मुहूर्त असल्याने नातेवाईकांनी अत्यंत मोजक्या उपस्थितीत व साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता सदाशिव गव्हाणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गव्हाणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





















