
जळगाव मिरर | ६ मे २०२६
शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या पालकांसह एकूण पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजता चाईल्ड हेल्पलाइन (१०९८) वर अज्ञात व्यक्तीकडून भुसावळ येथील तेली समाज मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या माहितीची दखल घेत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने तत्काळ पथक घटनास्थळी रवाना केले. हे पथक दुपारी सुमारे १:४० वाजता घटनास्थळी पोहोचले असता विवाह विधी पूर्ण झालेला आढळून आला. यावेळी मुलगी व मुलाच्या वडिलांकडे जन्म तारखेचा पुरावा मागविण्यात आला; मात्र तो तत्काळ सादर करण्यात आला नाही. त्यानंतर दि. १ मे २०२६ रोजी बालकल्याण समिती, जळगाव येथे मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत सादर करण्यात आली. या दाखल्याच्या पडताळणीत संबंधित मुलीचे वय विवाहाच्या दिवशी १७ वर्षे ८ महिने असल्याचे निष्पन्न झाले.




















