
जळगाव मिरर | ८ मे २०२६
दारुच्या नशेत असलेल्या पतीकडून पत्नीला वारंवार मारहाण करुन त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसी पार्क, कानळदा रोड) यांचा त्यांची पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना दि. ५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित मनिषा भरत पाटील (वय ४५) यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दि. ११ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे वास्तव्यास होते. त्यांना दारुचे व्यसन असल्यामुळे त्यांचे पत्नी मनिषा पाटील यांच्यासोबत नेहमी वाद होत. तसेच भरत पाटील हे पत्नीला नेहमी घर विकून घराबाहेर निघून जा असे म्हणत होते. दि. ५ मे रोजी मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्यानंतर त्यांचे पतीसोबत भांडण झाले. या सर्व गोष्टींचा राग अनावर झाल्यामुळे पलंगावर झोपलेल्या भरत पाटील यांचा त्यांची पत्नी मनिषा पाटील यांनी गळा आवळला, त्यानंतर पलंगावरुन खाली जोराने आपटून जीवेठार मारले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
मयताची पत्नी मनिषा भरत पाटील यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, रात्री न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर संशयित मनिषा पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना गुरुवार दि. ७ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ११ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोनि सागर शिंपी हे करीत आहे.





















