
जळगाव मिरर | १२ मे २०२६
सध्या राज्यात वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असून, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) भुसावळ येथील वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. याबाबत मा. प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रचंड उकाडा जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना उष्माघातासह विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातून व लांब अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन आयटीआयची वेळ बदलून सकाळी ७ ते दुपारी १२ अशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या विषयावर सकारात्मक विचार करून तातडीने सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
हे निवेदन विनोद पाठक (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी दिपक सोनवणे (शहर अध्यक्ष), सुशील मोरे, विलास कोळी, प्रणय भागवत व दशरथ सपकाळे उपस्थित होते.





















