
जळगाव मिरर | १४ मे २०२६
अमळनेर तालुक्यातील खवशी येथे घराच्या बांधकामावर काम करत असताना विजेचा धक्का लागून एका गवंडी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बांधकामावरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बलिराम फुलसिंग बारेला (वय ४८, मूळ रा. अछाली, ता. सेंधवा, जि. मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते सध्या कुटुंबासह अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे वास्तव्यास होते. गवंडी काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बलिराम बारेला हे खवशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर गवंडी म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी सुमारे ९.४० वाजेच्या दरम्यान ते बांधकाम सुरू असलेल्या घराच्या छतावरील भिंतीला पाणी मारत होते. यावेळी छतावरून गेलेल्या वीजवाहिन्यांचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की, ते जागीच कोसळले. घटनेनंतर त्यांच्यासोबत काम करणारे छोटू बलदार पिंजारी यांनी तातडीने नातेवाईकांना व ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेतील बलिराम बारेला यांना खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, बलिराम बारेला यांच्या मुलीचे येत्या २४ मे रोजी मूळ गावी लग्न होणार असल्याने त्यांची पत्नी छायाबाई व मुले काही दिवसांपूर्वीच गावाकडे गेले होते. त्यामुळे ते अमळगाव येथे एकटेच राहत होते. मुलीच्या लग्नाआधीच कुटुंबावर काळाने घाला घातल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात पंचनामा केला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भोई करत आहेत.





















