
जळगाव मिरर | १९ मे २०२६
शहरातील वाघनगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात मद्याच्या नशेत दोन जणांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत गावठी पिस्तुल काढून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ मे रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास वाघनगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात प्रवीण महाले (वय ४६) आणि खगेश चौधरी (वय २३) हे दोघे मद्यधुंद अवस्थेत परिसरात भांडण व गोंधळ घालत होते. त्यांच्या आरडाओरड व आक्रमक वर्तनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढत गेल्यानंतर संशयितांनी जवळील गावठी पिस्तुल बाहेर काढत नागरिकांच्या दिशेने रोखले. एवढेच नव्हे तर फायरिंग करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोघांना पकडून चांगलाच चोप दिला.
दरम्यान, रविवारी रात्री कोल्हे हिल्स परिसरात गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून एक जीवंत काडतूस आढळून आले. मात्र प्रत्यक्षात गोळीबार झाला की नाही, याबाबत अद्यापही पोलिसांकडून स्पष्टता आलेली नसून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे वाघनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दबक्या आवाजात गोळीबार झाल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी संशयितांकडून गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.






















