
जळगाव मिरर | २५ मे २०२६
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण अपघात घडून एसयूव्ही गाडीतील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दापोलीहून साताऱ्याकडे प्रवास करणारी स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अडीच वाजेच्या सुमारास पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहन अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळले. स्थानिकांच्या अंदाजानुसार संबंधित दरी सुमारे एक हजार फूट खोल असल्याने अपघाताची तीव्रता मोठी होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस, स्थानिक नागरिक तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत खोल दरी, दाट अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले. तरीही बचाव पथकांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू ठेवत मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावातील असल्याचे समोर आले आहे. अपघातातील मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून ते दापोलीहून साताऱ्याकडे परतत होते.
या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : अंश समीर चव्हाण (वय १९, रा. बोरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २२, रा. आसगाव, ता. सातारा), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०, रा. आसगाव, ता. सातारा), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१, रा. मर्ढे, ता. सातारा), निखिल अभिमन्यू शिंगटे (वय २५, रा. मर्ढे, ता. सातारा), महेश अनिल पवार (वय २५, रा. आसगाव, ता. सातारा), आदित्य अशोक साळुंखे (वय २१, रा. आसगाव, ता. सातारा) आणि राजेश अशोक काटकर (वय ३५, रा. खटाव, जि. सातारा).
या दुर्दैवी घटनेमुळे सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा अन्य तांत्रिक कारणांचा तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.





















