
जळगाव मिरर | २८ मे २०२६
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रभक्त व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र चौक येथील त्यांच्या पुतळ्याजवळील प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या राष्ट्रभक्ती, समाजकार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे, मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, संदीप गारुंगे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य सल्लागार मोहन गारुंगे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांचे राष्ट्रप्रेम, समाजकारण आणि दूरदृष्टी आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांनी सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी आणि समाजप्रबोधनासाठी कार्य करावे, असे आवाहनही मोहन गारुंगे यांनी यावेळी केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन केले. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.





















