
जळगाव मिरर | ३० मे २०२६
मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्हा सीमेवरील पुलावर घडलेल्या किरकोळ अपघातातून पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा मोठा कट उधळून लावला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, दोरी, लोखंडी रॉड, मोबाईल फोन तसेच बनावट क्रमांक प्लेट जप्त करण्यात आली आहे. तर वाहन चालकासह दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सेकंड मोबाईल पथक पहाटेच्या वेळी नियमित गस्त घालत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जणांनी घटनास्थळावरून पलायन केले. मात्र वाहनात असलेल्या अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली. झडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. त्यामुळे हे आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यास बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत विष्णू वाघ व कैलास कारभारी घोडके अशी असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





















