
जळगाव मिरर | ५ जून २०२६

दोन अल्पवयीन मुलांनी बेदरकारपणे कार चालवून ९ नागरिकांना जखमी केल्याच्या घटना दि. ३ जून रोजी सायंकाळी साडे सात वाजता रामानंद नगर चर्चजवळ घडली होती. या प्रकरणी दि. ४ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात वाहन चालवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह त्यांना कार उपलब्ध करून देणारा कार बाजारचा मालक रमेश राजवाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार बाजारचा मालक रमेश राजवाणी याने यापूर्वीही अनेकदा या अल्पवयीन मुलांना चालवण्यासाठी कार दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत पोलिसांनी रमेश राजवाणी याच्या कार बाजारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. अपघात घडला त्यावेळी कारमध्ये वाहन चालवणाऱ्या मुलांव्यतिरिक्त मागच्या सीटवर अन्य तीन अल्पवयीन मुले बसलेली होती. मात्र, अपघातात त्यांचा थेट सहभाग नसल्याने त्या तिघांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेत सहभागी असलेल्या सर्व मुलांच्या पालकांना कार्यालयात बोलावून घेतले. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देणे किती महागात पडू शकते, याची जाणीव करून देत, भविष्यात मुलांच्या वर्तनावर आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी सर्व पालकांना दिल्या आहेत.




















