
जळगाव मिरर | २० जून २०२६

चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या जुन्या वादातून अक्षय भानुदास पाटील (२७, रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) या तरुणाचा निघृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना बसस्थानकाच्या मागील बाजूस गुरुवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास अक्षय घराबाहेर गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही. त्याला कुणीतरी जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पहाटे अक्षयला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना मिळाली. पोलिसांना बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पडीक घराजवळ रक्ताचे थारोळे आणि रक्ताने माखलेल्या विटा आढळून आल्या. यावरून अक्षयचा खून झाल्याचा संशय आहे. अक्षय याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बसस्थानक परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून त्याचा एका तरुणासोबत वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून दुकान लावण्याच्या वादातून संशयिताने विटेने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून अक्षयची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मयताचे वडील भानुदास राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात संशयित निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चाळीसगाव पोलिसांकडून सुरू आहे.




















