
जळगाव मिरर | २३ जून २०२६

विहिरीच्या उर्वरित अनुदानाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जामनेर पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक या कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या प्रकरणी सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याची जामनेर शिवारात शेती असून सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत पंचायत समितीमार्फत सिंचन विहिरीचा प्रस्ताव मंजूर झाला होता. या योजनेअंतर्गत विहिरीच्या कामासाठी शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात आले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर नावकर याने विहिरीची अधिकृत स्थळ पाहणी करण्यापूर्वीच गावातील रोजगार सेवकाच्या माध्यमातून ३० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने विहिरीची पाहणी करून छायाचित्रे घेतली होती. या प्रक्रियेनंतर तक्रारदाराला टप्प्याटप्प्याने ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.
मात्र, उर्वरित अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी तक्रारदाराने सागर नावकर याची भेट घेतली असता, “तुम्ही विहिरीचे ठिकाण बदलले आहे. त्यामुळे पुढील अनुदान मिळणार नाही. जर अनुदान हवे असेल तर ३० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. ८ एप्रिल आणि १४ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तांत्रिक सहाय्यक सागर नावकर याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणी अहवालाच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई करत सागर नावकर याच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू असून लाचखोरीच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.





















