
जळगाव मिरर | ३० जून २०२६

जळगाव तालुक्यातील आमोदा येथील प्रसिद्ध एकवीरा माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करत दानपेटीच लंपास केल्याची घटना २७ जूनच्या मध्यरात्री घडली. चोरट्यांनी गावाच्या मुख्य रस्त्याने न येता मंदिराच्या मागील गिरणा नदीपात्राच्या बाजूने प्रवेश करून दानपेटी उचलून नेली. काही अंतरावर ती फोडून त्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा येथील एकवीरा माता मंदिरातील दानपेटीत भाविकांनी अनेक दिवसांपासून अर्पण केलेली रक्कम जमा होती. याची माहिती चोरट्यांना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरी करण्यासाठी चोरट्यांनी मुख्य रस्ता टाळून मंदिराच्या मागील गिरणा नदीपात्राच्या बाजूने येत मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरालगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून ते मंदिराच्या आवारात उतरले. यानंतर चोरट्यांनी मंदिरातील लोखंडी दानपेटी उचलून नेली. मंदिरापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीजवळ दानपेटी फोडून त्यातील सुमारे ५५ हजार रुपयांची रोकड काढली आणि रिकामी दानपेटी तेथेच टाकून फरार झाले.
दरम्यान, पहाटे मंदिराचे पुजारी पंजाबराव सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात आले असता दानपेटी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ मंदिराचे पदाधिकारी व ग्रामस्थांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण पाटील व दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंदिरापासून काही अंतरावर टेकडीजवळ रिकामी दानपेटी आढळून आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दिनेश चव्हाण करीत आहेत.
विशेष म्हणजे, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे गिरणा नदीपात्राच्या दिशेने मंदिरात येताना तसेच दानपेटी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आले आहेत. या दृश्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींचा माग काढण्यात यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे भाविकांमध्ये चिंता व्यक्त होत असून धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




















