
जळगाव मिरर | २ जुलै २०२६

धरणगाव तालुक्यातील वराड येथे नातेवाईकांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी गुजरातमधील सुरत येथून आलेल्या मामेभाऊ व आतेभावाचा अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी दुचाकी अपघातात मामेभाऊ विनोद पाटील यांचा मृत्यू झाला, तर बुधवारी रेल्वे अपघातात आतेभाऊ धनराज पाटील यांनी प्राण गमावले. या दुहेरी दुर्घटनेमुळे चिंचपुरा, भांमर्डी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा व भांमर्डी येथील रहिवासी असलेले विनोद प्रताप पाटील (वय ५०) आणि त्यांचे आतेभाऊ धनराज निंबा पाटील (वय ५०) हे दोघेही रोजगारानिमित्त गुजरातमधील सुरत येथे वास्तव्यास होते. नातेवाईकांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी ते चिंचपुरा येथे आले होते. कार्यक्रमादरम्यान दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि मंगळवारी दुपारपर्यंत ते सोबत होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर विनोद पाटील हे नातेवाईकांच्या भेटीसाठी आपल्या मूळगावी भांमर्डी येथे दुचाकीने निघाले होते. मात्र, पिंप्री गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा धक्का कुटुंबीयांना बसलेला असतानाच दुसऱ्याच दिवशी आणखी एक दुर्दैवी घटना घडली. चिंचपुरा गावाजवळ बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात धनराज निंबा पाटील यांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन दिवसांत मामेभाऊ आणि आतेभावाचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गंधमुक्तीच्या कार्यक्रमानिमित्त झालेली दोघांची भेट हीच त्यांच्या आयुष्यातील अखेरची भेट ठरली. या दुहेरी दुर्घटनेमुळे चिंचपुरा, भांमर्डी तसेच परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक व ग्रामस्थांकडून दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





















