
जळगाव मिरर | २ जुलै २०२६

उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आरोग्य उपयुक्त गायकवाड मॅडम, सहाय्यक समीर बोरवले सर्व si आणि csi आणि मक्तेदार चे सुपरवायझर यांची उपमहापौर दालनात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी झाडू कामगार, गटर सफाई कर्मचारी तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर विशेष भर देत, सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी कसे ठेवता येईल, प्रत्येक प्रभागात नियमित झाडलोट, गटर सफाई, कचरा उचल व स्वच्छता कामे वेळेत पूर्ण कशी होतील यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना दर्जेदार स्वच्छता सेवा मिळणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. स्वच्छतेच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अन्यथा संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
शहर स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.




















