
जळगाव मिरर | १ जुलै २०२६

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पुलावरून तापी नदीत उडी घेतलेल्या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी घडली. झुलेलाल किशोर कोळी (वय २५, रा. दर्यापूर) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे दर्यापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झुलेलाल कोळी यांनी मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हतनूर धरणाच्या पुलावरून तापी नदीत उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने शोधमोहीम सुरू केली.
त्या ठिकाणी नदीत पाण्याची पातळी कमी असल्याने शोधकार्य काही काळ सुरू होते. अखेर सुमारे एका तासानंतर स्थानिक मच्छीमारांनी अथक प्रयत्नांनंतर झुलेलाल कोळी यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना तत्काळ वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
झुलेलाल कोळी हे वरणगाव येथील आयुध निर्माणीमध्ये खासगी वाहनचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दर्यापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल यासीन पिंजारी, मनोज मस्के, प्रशांत ठाकूर आणि राकेश झोपे पुढील तपास करीत आहेत.





















