जळगाव मिरर | ४ जुलै २०२६
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एकलग्न गावात ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. येथून जवळच असलेल्या एकलग्न गावात एका कृषी केंद्रात ट्रक (एमएच १९, झेड २०११) मधून खतांच्या गोण्या उतरवण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, याच ट्रकच्या मागे उत्तम मोहन पाटील (वय ७५) हे बसलेले होते. तर, ट्रक चालकाला उत्तम पाटील हे ट्रकमागे बसल्याची कल्पना नव्हती. तर, ट्रक मागे घेत असताना ट्रकच्या चाकाखाली आल्याने दाबले गेल्याने उत्तम पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना गावात माहित पडताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तर, घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी धाव घेऊन मदतकार्य केले.
यानंतर ट्रक चालक शेख अमिन शेख नबी (रा. दूध फेडरेशन, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच वेळी येथील शिवसेनेच्या शाखेची रूग्णवाहिका दाखल झाली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात उत्तम पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे





















