जळगाव मिरर | १२ जुलै २०२६
पारोळा-चाळीसगाव मार्गावरील मेहू-टेहू गावाजवळ भरधाव महिंद्रा वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रस्ते बांधकाम कंपनीतील २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार, १० जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पारोळा पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील एसबीडी इन्फ्रा प्रा. लि. कंपनीमार्फत पारोळा ते चाळीसगाव मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले विश्व विजयचंद्र कौशिक (वय २५, रा. नरें बुजुर्ग, पो. राजगड, ता. गगहा, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) हे कंपनीची दुचाकी (एमएच-१८, सीएम-३७२९) रस्त्याच्या कडेला उभी करून उभे होते.
याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा कंपनीच्या वाहनाने (एमएच-१८, बीजी-१६०२) दुचाकीसह विश्व कौशिक यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विश्व कौशिक यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी महिंद्रा वाहनाचा चालक देवेंद्र किशोर पाटील याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. रस्ते बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या या अपघातामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा ठिकाणी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाय अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




















