जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२६
कामानिमित्त नाशिक येथे गेलेल्या जयश्री संजय पाटील (वय ५५, रा. रायसोनी नगर) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून ५१ हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ८९ हजार रुपनांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २० सप्टेंबर ते दि. २१ सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या सुमारास रायसोनी नगरात घडली, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगरात जयश्री पाटील या वास्तव्यास असून त्यांचे शिरसोली रस्त्यावर लॉन्स आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता त्या खासगी कामानिमित्त नाशिक येथे जाण्याकरीता घराला कुलूप लावून निघाल्या. दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता, त्यांना घराचा दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला होता तर घराचे दार लोटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेला होता, त्यांनी लागलीच घरातील लोखंडी कपाट तपासण्याकरीता गेल्यानंतर त्यांना कपाट उघड होते तर त्यातील वस्तु वा बाहेर फेकलेल्या होत्या. घरातील व कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेला असल्यामुळे जयश्री पाटील यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच कपाटातील ऐवज तपासल्यानंतर चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोकडसह सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची खात्री झाली.
चोरट्यांनी जयश्री पाटील यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची टॉप्स, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्चा बांगड्या, ५१ हजार रुपयांची रोकड व ३ हजार रुपयांचे एमव्हीआर असा एकूण ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .





















