जळगाव मिरर | १५ जुलै २०२६
वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळशीलीला बहुउद्देशीय संस्था, जळगावचे अध्यक्ष श्री. तुषार निर्मलाई वसंतराव सैंदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

हा उपक्रम विपश्यना केंद्र, उमाळे (एम.आय.डी.सी. परिसर) तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पालगत नव्याने उभारण्यात आलेल्या फोर-वे महामार्गाच्या कडेला राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे, हरित क्षेत्रात वाढ करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या वृक्षारोपण मोहिमेचा संकल्प श्री. प्रविणजी वाणी, श्री. तुषार सैंदाणे आणि श्री. विशालभाऊ हिरे यांनी संयुक्तपणे केला असून, या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजासाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन परिणाम करणारा उपक्रम राबविण्याची संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वृक्षारोपणाबरोबरच लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही संबंधितांकडून स्वीकारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. सामाजिक कार्यासोबत पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.



















