जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
मंत्रालयात थेट नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन उच्चशिक्षित तरुणांना तब्बल ५५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. संदेश दशरथ शिरसाठ असे या संशयिताचे नाव असून, तो स्वतःला चक्क ‘न्यायाधीश’ भासवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला मुंबईत अटक केली असून, त्याच्याकडून न्यायाधीशाचे बनावट ओळखपत्र आणि अंबर दिव्याची कार जप्त करण्यात आली आहे. मेहरूण येथील हॉटेल व्यावसायिक कुणाल नाईक यांच्या दोन भावांसह एका मित्राची या टोळीने फसवणूक केली होती. यापूर्वी अटक करण्यात आलेला स्वप्नील जयस्वाल याने स्वतःला मंत्रालयातील बांधकाम विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत, सचिव स्तरावर ओळख असल्याचा बनाव रचला होता. महाराष्ट्र शासनाचा फलक असलेली गाडी व महागडा पेहराव दाखवून त्याने तरुणांचा विश्वास संपादन केला व नोकरीच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक निरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने स्वाती जुनागडे, स्वप्नील जयस्वाल व अमित जयस्वाल यांना आधीच अटक केली होती.
तपासादरम्यान मुख्य सूत्रधार संदेश शिरसाठ याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला मुंबईत गाठले. ताब्यात घेतल्यानंतरही त्याने स्वतःला न्यायाधीश सांगत पोलिसांवर रुबाब झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र सखोल चौकशीत त्याचा खोटेपणा उघड झाला. आता बनावट “वकील” साथीदाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.




















