जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरातील मुली व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जळगाव महानगरपालिकेने मोफत स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे, तसेच या परिसरात कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व तरुणी वास्तव्यास असून, सध्याच्या सामाजिक परिस्थितीत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. अशा प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीचा धैर्याने सामना करण्याची क्षमता विकसित होईल.
प्रस्तावित प्रशिक्षण शिबिरात कराटे, सेल्फ डिफेन्सची विविध तंत्रे, आपत्कालीन प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय, महिलांचे कायदेशीर हक्क तसेच महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करून दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी केवळ एकदाच शिबिर आयोजित करण्याऐवजी रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे परिसरातील मुली व विद्यार्थिनींना नियमित प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल आणि त्यांच्यात आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीची महानगरपालिकेने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे तसेच कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती नागरिकांनी केली आहे. या उपक्रमामुळे मुलींच्या सुरक्षिततेसह महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.




















