मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्याच्या कन्या वंदना पूनमचंद जैन यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव या अत्यंत महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर नियुक्ती झाल्याने मुक्ताईनगर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, व्यापारी व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वंदना जैन या स्वर्गीय पूनमचंद मोतीलाल जैन (बोथरा), माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या कन्या आहेत.

कर्तृत्व, प्रामाणिकता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर त्यांनी ही मानाची जबाबदारी मिळविल्याबद्दल मुक्ताईनगरच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव म्हणून कार्यरत असताना राज्यातील बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण, शिक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, व्यापारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




















