जळगाव मिरर | १८ जुलै २०२६
नीट (NEET) परीक्षेत दुसऱ्यांदा बसूनही अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून नागनचौकी (ता. जामनेर) येथील २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे नागनचौकीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्पर्धा परीक्षांमधील वाढता मानसिक ताण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. जामनेर तालुक्यातील नागनचौकी येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ ज्ञानेश्वर पाटील (वय २०, रा. नागनचौकी, ता. जामनेर) याने वैद्यकीय शिक्षणासाठी होणारी नीट परीक्षा दिली होती. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नसल्याने त्याने खचून न जाता वर्षभर मेहनत घेत पुन्हा परीक्षेची तयारी केली. कुटुंबीयांनीही त्याला धीर देत पुढील प्रयत्नासाठी प्रोत्साहन दिले होते.
मात्र, यंदाही अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने समर्थ मानसिक तणावात होता. शुक्रवारी दुपारी त्याचे वडील काही कामानिमित्त जामनेर येथे गेले होते. आई घरात विश्रांती घेत होती, तर बहिण शाळेत गेली होती. याचवेळी समर्थने गावाजवळील शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
समर्थ हा अभ्यासू, शांत आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नव्हता, मात्र स्पर्धा परीक्षेतील अपयशाचे दडपण आणि स्वतःच्या अपेक्षांचे ओझे त्याला असह्य झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
समर्थच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांवर वाढणारा मानसिक ताण, अपयश स्वीकारण्याची गरज आणि वेळेवर मानसिक आधार उपलब्ध होण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




















