जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर आणि जगतगुरु महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. १८ जुलै २०२६ रोजी रामेश्वर कॉलनीतील मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या विचार वारसा फाउंडेशन कार्यालयात झालेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग वाढावा, नवमतदारांची नोंदणी व्हावी तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशीलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात नागरिकांना मतदार नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जगतगुरु महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. अलका राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव महानगरचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी तसेच विशाल देशमुख (विचार वारसा फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक पात्र नागरिकाने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये अजय मांडोळे, मनीषा चौधरी, शुभम निकम, ऋषिकेश राजपूत, चेतन राजपूत, राहुल पाटील, संकेत म्हस्कर, आशिष राजपूत, अभिजित राजपूत आणि मयूर डांगे यांनी नियोजनापासून नागरिकांना मार्गदर्शन करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी तसेच आवश्यक दुरुस्ती प्रक्रियेचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी आयोजकांनी “आपला एक छोटासा प्रयत्न, लोकशाहीला बळकट करणारा महान संकल्प” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने मतदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.




















